मित्रांनो, माझा जन्म कधी झाला, हे जरी मला आठवत नसले, तरी तो रामायण-महाभारत घडण्याच्या आधी नक्कीच झाला. कारण राम माझ्या अंगावरूनच वनवासात गेले तर महाभारतासाठी माझाच वापर झाला. मला आठवते- माझ्या लहानपणी माझे नाव ‘पायवाट’ असे होते. अगदी पायी जाण्यापासून तर बैलगाडी, खेचर, घोडागाडी सुद्धा बिनभोबाट माझ्या अंगावरून जायची. पण मला कधी त्रास व्हायचा नाही, अगदी खाचखळगे असून सुद्धा!
मी अगदी किर्रऽऽ घनदाट जंगलातून सुद्धा पसरलेलो होतो, ज्यावरून हिंस्त्र श्वापदेही फिरायचे, पण मला त्यांची कधी भीती वाटली नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबार्ई, स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच अनेक रथी- महारथी, स्वातंत्र्य सैनिक देश प्रेमाखातर माझ्या अंगावरून स्वारी करून जायचे, याचा मला नितांत अभिमान वाटायचा.
माझ्या आजूबाजूला घनदाट झाडेझुडपे असल्याने पाऊस, उन्हापासून माझे संरक्षण व्हायचे. मी वयात यायला लागलो तसे माझे रूंपांतर डांबरीकरणामध्ये व्हायला लागले. जसे जसे रस्ते डांबरांनी काळेशार व्हायला लागले, तुम्हा सर्वांना माझ्यावर स्वारी करायला मजा वाटायची पण एकदा का डांबरी रस्त्यावर पाणी साचले की तिथे खड्डा पडलाच पाहिजे. दोन-तीन वर्षे गेली की परत नवीन डांबराचा रस्ता बनवणे सुरू असते. माझ्या आजूबाजूची सर्व झाडे तोडुन टाकतात म्हणून पावसाचे पाणी सरळ माझ्या उरावर पडते वर उन्हाच्या झळांनी डांबर वितळून खड्डे निर्माण होतात.
आता मला सांगा मित्रांनो- यात माझा काय दोष ? मला तुम्ही प्रत्येक खड्यागणिक कोसत राहता. पण ज्याप्रमाणे तुम्हाला त्रास होतो, तसाच मला पण होतो. मधूनमधून केबल, इलेक्ट्रिक विभाग मला खोदायला घेतात.
माझ्या आजूबाजूला सुरू असलेले बांधकामाचे साहित्य माझ्या उरावर आणून टाकतात. कालांतराने हे वाळून त्याचे मोठेमोठे ढीग रस्त्यावर अतिक्रमण करतात पण या सर्वांकडे दुर्लक्ष करून सर्व मला दोष देतात.
पुढे जसे माझे तरुण वय सरत आले. माझ्यात क्रांती घडणे सुरू झाले. आता संपूर्ण देशात माझे सिमेंटीकरण होत आहे. पण हे करताना जो विलंब होतो आहे, तो अतिशय क्लेशदायक आहे. नाही म्हणायला जे रस्ते सिमेंटचे झाले आहेत, त्यावरून तुम्हाला स्वारी करताना बघून माझा उर अभिमानाने भरून येतो.
याच्या पुढची पायरी म्हणजे ‘पेव्हर ब्लॉक्स!’ हे जेव्हा माझ्या उरामध्ये फसवायला संबंधित विभागाने सुरुवात केली, तेव्हा मला हसू की रडू कळेना! कारण एकतर हे जरी गोंडस दिसत असले, तरी माझे वय कमी करू शकत नव्हते. भरीस भर एकसंघ लावण्याचा अभाव असल्याने पाणी जिरणे, लेव्हलिंग खालीवर होणे असे घडू लागले. होणारे अपघात माझ्या काळजाला चिरे पाडू लागले.
पण जसे जसे माझे वय वाढत चालले, तसा मी पण उर्मट बनत चाललो आहे. कारण मला माहिती आहे की एका हाताने टाळी वाजत नसते. म्हणून माझी विनंती आहे की- सर्व संबंधित विभाग व आपल्यासारखे सुजाण नागरिक एकत्र येऊन समन्वय राखून माझे पुनर्वसन करून जोडीला आजूबाजूला वृक्षरोपण केले, तर माझा सुवर्ण युग दूर नाही
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें