यह ब्लॉग खोजें

गुरुवार, 28 मई 2020

मजुराचे मनोगत

मजुराचे मनोगत 

मुंबई शहरात हे टॉवर बांधले जात आहेत, त्या टॉवरवर काम करणारा मी एक मजूर आहे. गावात आम्ही सुखी होतो. पण सावकाराच्या कर्जात जमीन विकावी लागली म्हणून आम्ही मुंबईत आलो.
मुंबईत भाकरी मिळते, पण राहायला जागा मिळत नाही. धारावीच्या झोपड़पट्टीत एका झोपडीवाल्याच्या झोपडीत कसेबसे राहतो. त्यासाठी रोजचे पन्नास रुपये मोजावे लागतात. बायको मुलांना निवारा मिळतो. मी तर बाहेर रस्त्यावरच झोपतो.

बांधकामाची मला प्रथम सवय नव्हती. उंचावर काम करताना भीती वाटायची. पण करणार काय? बायको माझ्या बरोबरीने काम करते. तिला दिवसभर बाळू सिमेंट यांची घमेली वाहावी लागतात. खूप कष्ट पडतात. सकाळी लवकर उठून ती भाकरी व भाजी करते आणि आम्ही घर सोडतो.

कामाच्या ठिकाणीच कॉन्ट्रॅक्टरने एक शाळा उघडली आहे. तेथे माझी मुलगी व मुलगा शिकतात. आम्हां दोघांचे मिळून दिवसाला २२५ रुपये मिळतात. त्यात भाडे, जेवण, कपडे सगळे भागवावे लागते. गावालाही म्हाताऱ्या आईवडिलांना पैसे पाठवावे लागतात.

 आता हा लॉकडाउनचा काळ आला. सगळे बांधकाम बंद पडले. उद्योग धंदे बंद झाले. कुठे ही काम मिळेना, वरून कोरोनाची भीती. काय करावं, समजत नाही. एखाद्या समाजसेवकांकडून जेवणाचे पैकेट भेटतात पण ते जेवण पुरेसे नसते. गावी जाण्याचा विचार करतोय पण तिथे जाऊनही काय होणार आहे?

हा काळ तर संपेल पण आमचे दुर्देैव कधी संपणार माहीत नाही. मुलांच्या भविष्याचे काय? या मुंबईत स्वत:ची एक झोपडी घेणेही मला शक्य नाही. कसे जगायचे एवढीच मला सतत काळजी लागून राहिलेली असते.
नारायण सुर्वे यांच्या शब्दांत -
दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली.....

रविवार, 24 मई 2020

थट्टा भारी पडली !!!

एका गावात रामदास नावाचा एक धनगर होता. त्याला सखाराम नावाचा मुलगा होता. सखाराम रोज आपल्या मेंढया घेऊन गावाबाहेर चरायला घेऊन जात असे. संध्याकाळ झाली की परत आणत असे.
त्याचा हा रोजचा दिनक्रम होता. तो जेथे मेंढ्या चरायला घेऊन जाई तेथे शेती होती. अनेक गावकरी तेथे दिवसभर काम करत असत.
एकदा तो असाच मेंढ्यांना चरायला घेऊन गेला होता. दुपार झाली. त्याने जेवण केले. पण नंतर त्याला फार कंटाळा येऊ लागला. काहीतरी गंमत करायची असे त्याने ठरवले. तो जोरात ओरडला, 'लांडगा आला रे आला !!!"
लोकांना खरे वाटले. ते शेतातली आपली कामे सोडून काठ्या घेऊन धावत त्याच्याजवळ आले. त्याला विचारू लागले, 'कुठे आला लांडगा?' तेव्हा तो मोठ्याने हसू लागला व म्हणाला 'मी तर गंमत केली होती तुमची !"
 शेतकरी संतापले. पण करतात काय? तसेच निघून गेले. सखारामला मात्र यात गंमत वाटली. दुसर्‍या दिवशी त्याने पुन्हा हाच उद्योग केला. शेतकर्‍यांना उगाचच एक हेलपाटा पडला. पुन्हा ‍सखाराम 'कसे फसवले' म्हणून हसू लागला. शेतकरी संतापून निघून गेले.
तिसर्‍या दिवशी तो पुन्हा मेंढ्या चरायला घेऊन आला. दुपार झाली आणि तो जेवायला बसला. पण त्या दिवशी खरेच एक लांडगा तेथे आला आणि एका मेंढीवर ताव मारू लागला.
सखाराम जोरजोरात ओरडू लागला 'लांडगा आला रे आला.' पण आजूबाजूच्या लोकांनी त्याला अजिबात भीक घातली नाही. तो नेहमीसारखीच थट्टा करतोय, असे वाटून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
लांडग्याने काही मेंढ्या मारून टाकल्या. सखाराम आपला झाडावर बसून रडू लागला. पण आता काहीच उपयोग नव्हता. त्याला आपली चूक लक्षात आली. पण आता फार उशीर झाला होता.

उपदेश/तात्पर्य ः थट्टा उडविणे केव्हाही वाईटच.

शनिवार, 23 मई 2020

प्रामाणिक लाकूडतोड्या ( गोष्ट लेखन )

एका गावात एक लाकूडतोड्या राहत होता . तो जंगलात जाऊन झाडांवर चढून लाकडे तोडत असे. एके दिवशी अचानक त्याच्या हातातून त्याची कुर्‍हाड झाडाखालच्या नदीत कोसळली आणि तो धाय मोकलून रडायला लागला
त्याच्याकडे नवी कुर्‍हाड घ्यायला मुळीच पैसे नव्हते आणि त्याच्या कुटुंबाचे पोट त्याच्या या कुर्‍हाडीवरच चालत असे. तो झाडे तोडून लाकडं विकून पैसे जमवत असत.
हे सारं वनातल्या देवाने पाहिलं . तो त्या लाकूडतोड्याची परीक्षा घेण्यासाठी रूप बदलून तेथे आला आणि त्याला रडण्याचे कारण विचारले. लाकूडतोड्याने त्याला झालेला सगळा प्रकार सांगितला आणि त्याला कुर्‍हाड मिळवण्यासाठी मदत करण्याची प्रार्थना केली.
देवाने पाण्यात उडी घेतली. आधी त्याने एक सोन्याची कुर्‍हाड काढली आणि त्या लाकूडतोड्याला विचारले - "ही का तुझी कुर्‍हाड?" 

लाकूडतोड्या म्हणाला, "नाही". मग देवाने चांदीची कुर्‍हाड काढली. लाकूडतोड्या म्हणाला, "हीसुद्धा माझी कुऱ्हाड नाही." 
मग देवाने त्याची खरी कुर्‍हाड नदीतून बाहेर काढली आणि विचारले - "मग ही आहे का तुझी कुऱ्हाड?" लाकूडतोड्याला खूपच आनंद झाला. तीच त्याची खरी कुर्‍हाड , लोखंडाची कुऱ्हाड होती.
देव आपल्या खऱ्या रूपात आला आणि विचारले -"मी तुला आधी सोने आणि चांदीची कुर्‍हाड दिली, तरी तू त्याला नाही का म्हणालास?" लाकूडतोड्या देवाला म्हणाला, "प्रभू माफ करा परंतु जी वस्तू माझी नाही तिला मी माझी का म्ह़णू? मी बेईमानी करू शकत नाही."

देव त्याच्या या उत्तरावर खूश झाला. त्याला त्या तीनही कुर्‍हाडी भेट दिल्या.
तात्पर्य: तुम्ही तुमचे काम अगदी प्रामाणिकपणे केले तर, देव आणि दैवं तुम्हाला कितीतरी पटीने अधिक देते.

केदारनाथ : एक अनुभव

  मी 2012 मे महिन्यात केदारनाथला गेले होते. पायी गेलो होतो आम्ही पण दोन सीनीयर सिटीजन डोली मध्ये गेले. परत खाली येताना  वाटेवर एक घोडा मेलेल...