या मुलांनो या ! मला वाटलेच होते की मी गावात आलो की तुम्ही मला भेटायला येणार ! काय म्हणालात ? कसं वाटते मला सैन्यात गेल्याबद्दल? अरे बाबांनो, सैन्यात जाणे माझे ध्येयच होते. थांबा, मी तुम्हांला माझी कहाणीच सांगतो.
माझे वडील भारतीय सैन्यात होते. मी तीन वर्षांचा असतानाच माझ्या बाबांना शत्रूबरोबर लढताना मरण आले. आजोबांनी व आईने मला मोठे केले. सैन्यात दाखल व्हायचे असे मी ठरवले. पाचव्या इयत्तेपासूनच मी सातारच्या सैनिकी शाळेत दाखल झालो. मी वसतिगृहात राहायचो. मग मी सैनिकी महाविदयालयात नाव घातले. तेथे पदवी मिळवतानाच मला सैन्यात नोकरी मिळाली. पहिले दीड वर्ष वेगवेगळे तांत्रिक शिक्षण घेण्यात गेले. ते पूर्ण झाल्यावर 'मेजर' म्हणून भारताच्या उत्तर सीमेवर माझी नेमणूक झाली.
आमचे काम खूप अवघड आहे. आम्ही जेथे असतो तो भाग अतिशय थंड आहे. कारगिलसारखा अतिथंड प्रदेश असो अथवा उन्हाचे चटके देणारे वाळवंट असो, आम्ही डोळयांत तेल घालून सीमेची राखण करतो. जमीनीवरच नव्हे तर समुद्रातही आमचे बांधव जहाजांवरून शत्रूवर नजर ठेवतात. शत्रूकडून मारा सुरू झाला, तरी आम्ही आपले ठाणे सोडत नाही. शत्रूच्या हल्ल्यात आपले सहकारी मृत्यू पावले, तर फार दुःख होते.
सैनिकाचे जगणे मोठे अवघड असते, त्याला राष्ट्रासाठी लढावे लागते, हेच त्याचे कर्तव्य आहे. मनात बायको पोरांचा कितीही विचार असला, घराची कितीही आठवण येत असली तरी शत्रूपासून देशाची रक्षा करणे हेच त्याचे ध्येय असते. आम्ही फक्त बंदूक घेऊन शत्रूशी लढण्याचे काम करतो, असे नाही. कुठे पूर आला, भूकंप आला तरी आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी धावतो. दुर्गम पर्वतीय भागात आम्ही रस्ते बांधतो. तीर्थयात्रेला जाणाऱ्यांचे संरक्षण करतो. दंगलीच्या वेळी, निवडणुकींच्या वेळी शांतीचे वातावरण निर्माण करण्यासाठीही सैन्याची मदत घेतली जाते.
माझ्या सैनिकी जीवनात मला अजून प्रत्यक्ष लढण्याची संधी मिळाली नाही. हल्ली तर अतिरेकी हल्ल्यांचे संकट सतत घोंघावत असते पण माझ्या देशाच्या रक्षणासाठी मी सदैव तयार असतो. ते मी माझे परमभाग्य समजतो."