वसंत ऋतू फाल्गुन व चैत्र महिन्यांत येतो. सर्व ऋतूंमध्ये सुंदर व बहारदार ऋतू आहे- वसंत ऋतू म्हणून तर याला 'ऋतुराज' म्हणतात. वसंत ऋतूमध्ये हवा खूप सुखद असते. हिवाळा संपू लागतो. वातावरण प्रसन्न वाटते.
वसंत ऋतूत वृक्षवेलींना नवीन पालवी येते. रंगीबेरंगी फुले फुलू लागतात. आंब्याच्या झाडांना मोहर येतो. पळसाची लाल नारंगी रंगाची फुले फुलू लागतात. फुलपाखरे शेतांत व बागांत बागडू लागतात. कोकीळ पक्षी मधुर गायन सुरु करतो. निसर्गाचे सर्व घटक, सगळे वृक्ष, पशु, पक्षी, वसंताचे स्वागत करण्यासाठी सज्ज होतात.
पिंपळ, क्ड, लिंब, आंबा अशा अनेक झाडांवर गर्द पोपटी हिरवी पालवी फुटते. ज्या झाडांची पाने पानझडीच्या काळात पडून गेली होती, त्या झाडांवर कोवळी हिरवी लुसलुशीत पाने येतात. अनेक प्रकारचे रंगीबेरंगी सुंदर सुंदर पक्षीही झाडांवर दिसू लागतात.
शेतांत गव्हाचे पीक डोलू लागते. मोहरीच्या पिवळयाधम्मक फुलांचे गालीचे शेतांवर पसरलेले दिसतात. निसर्गाचे सौंदर्य या ऋतूत मनाला भुरळ पाडते. सृष्टी जणू रंगाचा व सुगंधाचा उत्सव साजरा करत आहे, असे वाटते. लोकांचे मनही उत्साहाने भरलेले असतात, हिवाळयात मनावर आलेली मरगळ व आळस दूर होते. गोड गोड द्राक्षे, ऊस, कलिंगड, आंबे व अनेक प्रकारची फळे पिकायला लागतात. शिवरात्री, होळी, वसंतपंचमी, रंगपंचमी, असे अनेक सण या ऋतूत येतात व मनाला धुंद करतात.
आनंदाने, ऊर्जेने व चैतन्याने भरलेला हा वसंत ऋतू मला खूप आवडतो.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें