उन्हाळा वाढत चालला होता. नद्या, नाले, ओढे, डोंगरावरून पडणारे ओहोळ कोरडे पडू लागले. रानातील गवत सुकले. पाणथळ जागेच्या आश्रयाने पक्षी घरटी बांधू लागले. एक बगळा झाडाच्या शेंड्यावर बसला होता. सूर्य मावळत होता. बगळ्याची नजर दूरवर असलेल्या एका तळ्याकडे लागली होती. तळ्यात खूप मासे फिरत असलेले त्याला दिसत होते. आपल्याला ते कसे मिळतील या विचारात असता सूर्यास्त झाला. झाडावरच तो झोपी गेला.
सकाळ झाली तशी बगळा उठला. पंख पसरून उडत उडत तो तळ्याकाठी आला. एकेक पाऊल टाकीत तो तळ्यात उतरला. एक पाय उचलून, चोच वर करून त्याने डोळे मिटले व "राम राम" म्हणू लागला. तळ्यात शिरता क्षणी काठावरचे मासे सुळकन तळ्यात गेले. थोड्यावेळाने एक बारीक मासा त्याच्याजवळ आला व धिटाईने त्याला म्हणाला, " अहो बगळेबुवा, तुम्ही आम्हाला खात कसे नाही?" त्यावर बगळा म्हणाला, "अरे, आता मी मासे खाणे सोडून दिले. मी फक्त पाण्यात उभे राहून ध्यान करतो व तोंडाने "राम राम" म्हणतो. बगळा आपल्याला खात नाही असे बघून मासे धीट झाले. ते त्याच्याजवळून पोहू लागले.
काही दिवसांनी तो माश्यांना म्हणाला, "तुम्हाला माहीत आहे का? उन्हाळा वाढतो आहे. या तळ्याचे पाणी आटणार, मग तुमचे कसे होणार?" मग आम्ही जायचे कोठे? एक मासा म्हणाला. त्यावर बगळा म्हणाला, " माझे लक्ष आहे. या डोंगरापलीकडे एक मोठे तळे आहे. त्यात खूप पाणी आहे. लाटांवर लाटा उसळत असतात. त्यात मासे आहेत, कासवे आहेत, बेडूक आहेत. पण! "पण म्हणजे?" मासे म्हणाले. "तुम्ही त्या तळ्यात कसे जाणार? मी तुम्हाला तिकडे नेऊ शकेन, पण एका वेळी फक्त चौघांना. याल तुम्ही?" बगळा म्हणाला. "हो हो. आम्ही नक्की येऊ." मासे म्हणाले.
दुसरे दिवशी बगळा तळ्यात उतरला. त्याच्या भोवती मासे जमले. त्याने आपल्या चोचीत चार मासे घेतले व तो आकाशातून उडत उडत जाऊ लागला. गाव ओलांडले, ओढा पार केला व डोंगर माथ्यावर आला. तो हळूहळू खाली उतरू लागला. मासे म्हणाले , "बगळेबुवा, आपले तळे कुठे आहे?" तशी बगळा म्हणाला, "कुठचे तळे, आणी कुठचे पाणी. मी आता तुम्हाला खाणार आहे." असे म्हणून त्याने एकेक मासा खडकावर आपटून खाऊन टाकला. उंच झाडावर बसून फांदीला आपली चोच पुसली व सायंकाळी त्याच झाडावर झोपला. दुसऱ्या दिवशी परत चार मासे खाल्ले. असे बरेच दिवस चालले.
हे सर्व एक खेकडा गवतावर बसून पाहत होता. तिरका तिरका चालत तो त्याच्या जवळ आला व त्याचा पाय पकडून म्हणाला, " बगळेबुवा, मला केंव्हा नेणार मोठ्या तळ्यात?" बगळा मनात म्हणाला, "मी रोज मासे खातो आहे. चला आज खेकडा खाऊ." खेकडा म्हणाला नेणार ना? "चल, आज तुला नेतो." बगळा म्हणाला. खेकडा त्याच्या पायावरून चढत जाऊन त्याच्या पाठीवर बसला. त्याला घेऊन बगळा उडाला व नेहमीप्रमाणे डोंगरावर उतरू लागला.
खेकड्याने खाली पाहिले. खेकड्याला त्याचा डाव कळला व म्हणाला, " बगळेबुवा, हा तर डोंगर आहे." त्यावर बगळा हसला व म्हणाला," कुठचे तळे व कुठचे पाणी. आता मी तुला खाणार आहे." खेकडा त्याच्या मानेवर उतरला व म्हणाला, "बऱ्या बोलानं मला माझ्या तळ्यात नेऊन सोड. नाहीतर तुझी मान कापीन." बगळा व खेकड्यामध्ये झटापट सुरू झाली.
खेकडा त्याच्या मानेवर बसल्याने त्याला काहीच करता आले नाही. खेकड्याने आपल्या नांग्या त्याच्या मानेत रुतवल्या व त्याची मान कापली. दोघेही डोंगरावर आपटले. खेकडा तिरका तिरका चालत डोंगऱ्याच्या पायथ्याशी आला व रानातून चालत चालत परत आपल्या तळ्याच्या काठापाशी आला व डुबकन पाण्यात उतरला. त्याला पाहून मासे त्याच्या भोवती गोळा झाले. खेकडा माशांना म्हणाला, "अरे, तो बगळा पक्का ढोंगी होता. मी त्याला ठार मारले आहे. कितीही उन्हाळा वाढला तरी या तळ्यातील पाणी आटणार नाही. या तळ्यात भरपूर पाणी आहे."
अशा रितीने बाकीचे मासे त्या तळ्यात पुन्हा आनंदाने नांदू लागले.